पावसाळी कालावधीत जोरदार वा-यामुळे पडणारे वृक्ष व वृक्षाच्या फांदयामुळे रस्ते वाहतुकीला आणि रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होते. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक मा.श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे मार्गदर्शनानुसार, जोरदार वारा आणि पावसामुळे पडलेले वृक्ष व वृक्षाच्या फांदया त्वरित उचलण्याकरिता आणि वाहतुकीला आणि रहदारीला निर्माण होणारे अडथळे दूर करुन नागरिकांना यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे.
आपत्कालीन प्रसंगी वृक्ष व वृक्षांच्या फांद्या कोसळून वाहतुकीला, रहदारीला अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांना आढळल्यास त्याबाबतच्या तत्पर कार्यवाहीसाठी कृपया संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी ( दिघा ते बेलापूर 8 विभाग कार्यालये ) यांचेशी किंवा 101 या क्रमांकावर अग्निशमन विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईट) तक्रार निवारण प्रणाली (public grievance system) मध्ये ऑनलाईन तक्रारही दाखल करता येईल.
याशिवाय गृहनिर्माण सोसायटी परिसरातील वृक्षांच्या अनावश्यक / धोकादायक फांद्या छाटणी करावयाची असल्यास परवानगीसाठी निम्नदर्शित नमूद करण्यात आलेल्या विभाग कार्यालयाकडील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचेशी संपर्क साधता येईल.
तरी पावसाळी कालावधीत पडलेले वृक्ष व वृक्षांच्या फांद्या यामुळे वाहतुकीला व रहदारीला अडचण निर्माण होऊ नये आणि गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment