Friday, June 26, 2020

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला करोनायुद्धाचा आढावा

 

·       मास स्क्रीनिंग, काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश

·       ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना

·       जनरल प्रॅक्टिशनर्सना दवाखाने सुरू करण्याचे आवाहन

 

नवी मुंबई  नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या उपचारांत हयगय होऊ नये, यासाठी ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्याचे निर्देश देतानाच कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. स्क्रीनिंगमुळे संभाव्य करोनाबाधित रुग्ण सुरुवातीच्याच टप्प्यात सापडून त्याचे जलद विलगीकरण करून करोनाची साखळी तोडणे शक्य होत असल्यामुळे स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवतानाच महापालिकेची टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्यानंतर करोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याची गंभीर दखल घेत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील पालिका आणि पोलिस प्रशासनासमवेत आढाव बैठक घेतली. लॉकडाउनमधून काही प्रमाणात मोकळीक दिली असली तरी ज्या भागांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, अशा कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. मास स्क्रीनिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. नवी मुंबईत जास्त रुग्णसंख्या असलेले भाग हॉटस्पॉट म्हणून निश्चित करून तिथे २९ तारखेपासून लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला खासदार राजन विचारे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेली रेमडेसिवीर व अन्य औषधे मागवण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिकेला दिले. यामुळे गरीब गरजू रुग्णांना ही औषधे उपलब्ध होतील, असे श्री. शिंदे म्हणाले.

करोनाविरोधातील लढाईत आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे आपण हजारो लोकांना करोनाची बाधा होण्यापासून वाचवले. तसेच, अनेकांचे प्राणही वाचवण्यात आपल्याला यश आले. करोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे या लढाईला सामोरे जावे लागेल, असे सांगून यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपले दवाखाने सुरू ठेवून प्रशासनाला या युद्धात मदत करावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment