Tuesday, June 30, 2020

विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आज 30 जूनला 7800 घरांतील 25 हजारहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागांमध्ये जास्त संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा  मोठ्या भागांमध्ये 29 जून ते 5 जुलै या काळात (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली) तसेच दि. 30 जून ते 6 जुलै या काळात 2 भागांमध्ये (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) घोषित करून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी खंडीत होण्याकरिता प्रभावी उपाययोजना राबवित घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे स्टोअर व कोपरखैरणे गाव या दोन विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रात 29 जून रोजी भेट देऊन मास स्क्रिनींगच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

      या 12 विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रांपैकी 29 जून रोजी 6 क्षेत्रांमधील मास स्क्रिनींगमध्ये 3463 घरांचे मास स्क्रिनींग करण्यात आले असून आज 30 जून रोजी 10 क्षेत्रांमध्ये 7796 घरांमधील 25503 व्यक्तींचे मास स्क्रिनींग करण्यात आले आहे.

 या मास स्क्रिनींगमध्ये जे कोव्हीड 19 संशयित सापडतील त्यांचे लगेच स्वॅब टेस्टिंग करुन संस्थात्मक विलगीकरण (Isolation) करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्तींची वेगळी नोंद स्क्रिनींग दरम्यान केली जात आहे.

      या मास स्क्रिनींगमधून कोरोना संशयित सापडून त्यांचे विलगीकरण करणे शक्य होईल व त्यांच्यामुळे त्यांच्या निकटवर्तींयांना लागण होण्याचा संभाव्य धोका टळेल असा विश्वास व्यक्त करीत नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. 



No comments:

Post a Comment