दि.२१ जून २०२० : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये २ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल देण्यात येत आहे.
उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. उदा. ग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीजबिल आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिटचा स्लॅब दर लावण्यात येत आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत वापरलेल्या युनिटची संख्या दर्शवून ३१ मार्च 2020 पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले आहेत. एवढी अचूकता महावितरणने संगणीकृत प्रणालीमध्ये वापरलेली आहे.
वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.
एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु, स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. हे तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या ऑनलाईनद्वारे वीजबिलाच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment