नागरिकांना कोव्हीड 19 आजाराप्रमाणेच कोव्हीड व्यतिरिक्त इतर आजारांकरिता तसेच महिलांना मॅटर्निटीकरिता पुरेशा प्रमाणात रूग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रूग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन केले असून त्यावर नियंत्रणाकरिता पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांचेकडे रूग्णवाहिका नियोजनाची जबाबदारी सोपविलेली आहे.
रूग्णवाहिकांच्या नियोजनामध्ये कोव्हीड 19 बाधित रूग्णांकरिता स्वतंत्र रूग्णवाहिका, कोव्हीड 19 बाधित रूग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती व कोव्हिड 19 संशयित व्यक्तींकरिता स्वतंत्र रूग्णवाहिका अशी संरचना केली आहे. कोव्हीड 19 करिता 19 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.
अशाचप्रकारे कोव्हीड 19 व्यतिरिक्त इतर आजाराच्या रूग्णांचीही काळजी घेत त्यांच्याकरिता 6 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.
त्याचप्रमाणे मॅटर्निटी प्रयोजना करिता प्रत्येक रूग्णालयास 1 याप्रमाणे 3 व परिमंडळ 1 व 2 साठी 2 अशा एकूण 5 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.
सध्या नवी मुंबई महानगरापालिकेच्या परिवहन उपक्रमातील 8 एन.एम.एम.टी. बसेसचे रूग्णवाहिकांमध्ये रूपांतर करण्यात आलेले असून आणखी 10 बसेसचे रूपांतरण रूग्णवाहिकेमध्ये करण्यात येत आहे.
याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून 3 रूग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे.
सदर रूग्णवाहिकांचे नियोजन व्यवस्थित रितीने होण्याकरिता अद्ययावत जीपीएस तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येत असून कोव्हिड 19 रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकांची सुयोग्य व्यवस्था करताना इतर आजारांच्या रूग्णांची व प्रसूतीसाठी येणा-या महिलांची गैरसोय होऊ नये याकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे.
No comments:
Post a Comment