Tuesday, May 5, 2020

कोव्हीड केअर सेंटरसाठी (CCC)सिडको एक्झिबिकेशन सेंटरची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली पाहणी

कोव्हीड केअर सेंटरसाठी सिडको एक्झिबिकेशन सेंटरची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली पाहणी

--------------------------------------------------

तेरणा हॉस्पिटल येथे 100 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलचे नियोजन

--------------------------------------------------

रिलायन्स ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये 60 बेड्सचे कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित


 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचाराकरिता वैद्यकीय व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विभागप्रमुखांची तातडीने बैठक घेत आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.

यामध्ये केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड केअर सेंटर (CCC), डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC), डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) अशाप्रकारे  तयार करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रुग्णालय व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेत त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले.

या अनुषंगाने वाशी येथील सिडको एक्झिबिकेशन सेंटर याठिकाणी कोव्हीड केअर सेंटर (CCC) सुरु करण्याच्या अनुषंगाने आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील व उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली व त्याठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरु करणयाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी अंदाजे 1200 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे दोन स्वतंत्र कक्ष असणार आहेत. यामधील एका कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोव्हिड - 19 बाधीतांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत तसेच  दुस-या स्वतंत्र कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन केलेल्या संशयित नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या स्नानगृहे व स्वच्छतागृहांची व्यवस्था मॉड्युलर स्वरुपात त्वरित करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

त्याचप्रमाणे घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी. पार्कमध्ये मेडिकल ॲण्ड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर या ठिकाणीही कोव्हीड केअर सेंटर (CCC) करिता 120 बेड्स असणार असून त्यामधील 60 बेड्स महानगरपालिका संदर्भित कोरोना संदर्भिय व्यक्तींसाठी राखीव असणार आहेत. येथे महानगरपालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. वरुण घिलडियाल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त यांनी केली आहे.  

तसेच सद्यस्थितीत वाशी सार्वजनिक रुग्णालयात 130 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) कार्यान्वित असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सेक्टर 22 नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये पहिल्या टप्प्यात 100 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) सुरु करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याठिकाणी महानगरपालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. रुषिभा जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19  नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना बाधीत व्यक्तींवर सुयोग्य उपचार व्हावेत व कोणताही रूग्ण वैद्यकीय उपचारांशिवाय राहू नये याकरिता वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त तातडीने निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणी करण्याकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे.

तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखून आपले नवी मुंबई शहर कोरोना मुक्त करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व घरातच थांबावे आणि कोरोनाची संसर्गाव्दारे वाढणारी साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment