Saturday, May 9, 2020

दररोज 500 कोरोना चाचण्या क्षमतेची लॅब नवी मुंबईत उभारा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची मागणी


नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे असून त्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वमालकीची नवी मुंबईत 500 कोरोना चाचण्या दररोज करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र लॅब उभारा,अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
लोकनेते आमदार नाईक यांनी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते , ठाण्याचे जिल्हाधिकारी आदींना पाठवले आहे.
नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 550 वर पोहोचला आहे. नवी मुंबईत महापालिका रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयात घेतलेले स्वाबचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्याचे अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. यादरम्यान ज्या संशयिताची कोरोना चाचणी झालेली असते आणि तो संशयित जर कोरोना बाधित असेल तर तो इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊन त्याच्यामुळे इतरांना संसर्गाचा धोका असतो. जर नवी मुंबई मध्येच प्रयोगशाळा स्थापन केली तर कोरोना चाचण्यांचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील आणि बाधित व्यक्तींवर तातडीने उपचार करणेही शक्य होणार आहे. यामुळे कोरोना ची लागण झालेल्या व्यक्तींमुळे इतरांना बाधा होण्याचा धोका कमी होणार आहे. अशा प्रकारची प्रयोगशाळा नवी मुंबईत सुरू करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या सर्व परवानग्या महापालिकेला तत्परतेने द्याव्यात, अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली आहे.
झोपडपट्टी आणि गावठाण भागात घरोघरी आरोग्य तपासणी करावी
नवी मुंबईतील दाटीवाटीचे विभाग असलेल्या गावठाण आणि झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची मागणी देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
या विभागांमध्ये लहान आकाराची असलेली घरे आणि सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे  कोरोना प्रसारासाठी पोषक वातावरण असते. गेल्या काही दिवसात या परिसरातून सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यावर नियंत्रण करायचे असेल तर या भागात डॉक्टर आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची पथके तयार करून येथील नागरिकांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत लोकनेते नाईक यांनी मांडले आहे. सोशल डिस्टन्स राखणे, हात धुणे, मास्कचा वापर करणे इत्यादी सुरक्षिततेच्या सवयींची त्यांना माहिती द्यावी. रहिवाशांकडून त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. या आरोग्य तपासणी मध्ये कोरोना संशयित अथवा कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठविणे., अशा सर्व उपाययोजनांमुळे गावठाण आणि झोपडपट्टी भागात कोरोना वर प्रभावीपणे नियंत्रण आणता येईल, येथील रुग्ण संख्येचा  उद्रेक टाळता येईल, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment