Thursday, May 7, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एपीएमसी तात्काळ बंद करा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची मागणी

एपीएमसी बाजार आवारातील अनेक घटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे नवी मुंबई शहरात या रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने एपीएमसी तात्काळ बंद करावी,
अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. 
आमदार नाईक यांनी देशाचे पंतप्रधान ,राज्याचे मुख्यमंत्री ,पणन मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ,कोकण विभागीय आयुक्त ,ठाण्याचे जिल्हाधिकारी यांना 7 मे 2020 रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णांचा आकडा 484 च्या पलीकडे गेला आहे. एकूण रुग्ण संख्या पैकी शंभरपेक्षा अधिक बाधित झालेल्या व्यक्ती या एपीएमसी मधील व्यापारी, माथाडी ,मापाडी, अधिकारी-कर्मचारी आहेत किंवा  त्यांच्यामुळे बाधित झालेल्या त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्ती आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. एपीएमसीमध्ये दररोज दुपटीने मालाची आवक होते सहाजिकच त्यामुळे गर्दीही होते. सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. एपीएमसीमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाजार आवारात भीतीचे वातावरण आहे. ही भीती येथील घटकांच्या मनामध्ये एवढी बसली आहे की काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजार समिती व्यवस्थापनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजातील इतर व्यक्तींच्या जीवाशी खेळ नको अशी भूमिका येथील घटकांनी घेतली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून एपीएमसी मधील घटकांचे कोरोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी त्याच बरोबर बाजार आवारातील संसर्गाचा नवी मुंबई शहरात इतरत्र फैलाव रोखण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एपीएमसी तात्काळ बंद करावी असे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.
वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरण कशासाठी उपलब्ध करून द्यावे...
नवी मुंबईत कोरोना बाधीतांचा आकडा वाढतो आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रुग्णवाढीचा वेग जास्त असेल असा अंदाज केंद्रीय पथकाने याअगोदरच महाराष्ट्राचा पाहणी दौरा करताना वर्तविला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिकेला देखील विलगीकरण कक्ष आणि वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त जागांची आवश्यकता भासणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेने काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोना वर उपचार सुरू आहेत. यापुढील काळात वाढत्या रुग्णसंख्येचा धोका ओळखून अधिकाधिक इमारती पालिकेला उपलब्ध करून घ्याव्या लागतील. कोरोना विरोधातील या लढाईमध्ये पालिकेला सक्षम करण्याची गरज आहे. राज्य कामगार विमा कर्मचारी मंडळाच्यावतीने वाशी येथील कामगार रुग्णालय इमारतीचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आलेला आहे. रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधून पूर्ण झाली असून वापराविना पडून आहे. ही इमारत नवी मुंबई महापालिकेकडे काही काळ कोरोना वरील वैद्यकीय उपचारासाठी आणि विलगीकरण पक्षासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वाची मागणीदेखील आमदार गणेश नाईक यांनी 7 मे रोजी पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्री ,राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री कामगार मंत्री , विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment