Tuesday, May 19, 2020

कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार रेटींग' संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

सतत दुस-या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेला कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार रेटींग' संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

 

            'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत आज देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणा-या स्टार रेटींगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने ना.श्री.हरदीपसिंह पुरी यांनी केली असून त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकवार फाईव्ह स्टार रेटींग जाहीर झाले आहे. देशातील 6 शहरांना कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटींग जाहीर झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

      स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 3 वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटींगच्या निकषान्वये बारकाईने सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती तसेच विविध स्थळांना अचानक भेट देऊन विविध ठिकाणच्या स्वच्छतेची व कचरा वर्गीकरण स्थितीची पाहणी केली होती. त्याचप्रमाणे कच-याचे संकलन व वाहतूक पध्दती तसेच कच-याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया याचीही बारकाईने पाहणी करण्यात आलेली होती. कोणतीही पूर्व सूचना न देता विविध ठिकाणांना भेटी देत तेथील नागरिकांशी ऐनवेळी संवाद साधून त्यांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले होते. अशा सर्वंकष पाहणीच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटींग जाहीर करण्यात आले आहे.

      यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 5 स्टार रेटींग प्राप्त झाले असून 5 स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. नवी मुंबईसह मध्यप्रदेश मधील इंदौर, कर्नाटक मधील मैसुर, गुजरातमधील सुरत व राजकोट आणि छत्तीसगढ मधील अंबिकापूर ही देशातील इतर 5 शहरे 5 स्टार रेटींगची मानकरी ठरली आहेत. मागील वर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटींग प्राप्त केले होते. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये स्वच्छ शहरात राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले होते.

      आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना नवी मुंबईला मिळालेल्या या कचरामुक्त शहराच्या फाईव्ह स्टार रेटींगबद्दल समाधान व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या 5 स्टार रेटींगचे श्रेय दैनंदिन स्वच्छता करणा-या सफाई कामगारापासून स्वच्छतेविषयी जागरूक असणारे लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचे असल्याचे सांगत सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

      कोरोनाच्या लढाईतही दैनंदिन स्वच्छतेविषयी जागरुकता दाखविली जात असून कोरोना बाधीतांकडून होणा-या कच-याची स्वतंत्रपणे शास्त्रोक्त रितीने विल्हेवाट लावली जात आहे. हा कचरा संकलित करताना कामगारांच्या सुरक्षेचीही सुरक्षा साधनांव्दारे काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामेही वेगाने सुरु आहेत. हे करताना मास्क, हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे व सोशल डिस्टसींग राखले जात आहे. 

      स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नवी मुंबई शहर स्वच्छ व आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी घरातच थांबून व सोशल डिस्टसींग राखून आपले योगदान द्यावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यापुढील काळात 5 स्टार रेटींगच्या पुढे जात आपली 7 स्टार रेटींग प्राप्त करण्यासाठी वाटचाल राहील असा विश्वास व्यक्त केला.


 

No comments:

Post a Comment