कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असताना कोरोना बाधीतांचा तपशील तपासला असता त्यामध्ये सद्यस्थितीतील 910 कोरोना बाधीतांपैकी 356 कोरोना बाधीत व्यक्ती या तुर्भे येथील ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये काम करणा-या वा त्यांच्या निकटच्या संपर्कामुळे कोरोना बाधीत झालेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी ए.पी.एम.सी. मार्केट बंद ठेवणेबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. तथापि ए.पी.एम.सी. मार्केटव्दारे संपूर्ण एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रातील भाजीपाला फळे, अन्नधान्य यांची गरज भागविली जात असल्याने ते पूर्णपणे बंद करणे शक्य नाही हे लक्षात घेऊन 11 मे पासून 17 मे पर्यंत संपूर्ण आठवडाभर ए.पी.एम.सी. मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या कालावधीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण ए.पी.एम.सी. मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली असून त्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून कांदा-बटाटा, मसाला व अन्नधान्य या 3 मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले आहे व आगामी 2 दिवसात भाजीपाला मार्केट व फळ मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. या कामाची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी, एपीएमसी मार्केटचे सचिव श्री. अनिल चव्हाण घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व मौलीक सूचना केल्या.
त्याचप्रमाणे ए.पी.एम.सी. मधील पाचही मार्केट 17 मे पर्यंत बंद राहणार असून या काळात तेथील व्यापारी कामगार, वाहतुकदार यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार 10 वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून 4 दिवसात अडीच हजारहून अधिक ए.पी.एम.सी. संबंधित व्यक्तींचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.
18 मे पासून ए.पी.एम.सी. मार्केटचे कामकाज पुन्हा सुरु करताना जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन व्हावेत म्हणजे निर्मितीच्या ठिकाणाहून माल उचलून थेट विक्रेत्यापर्यंत पोहचेल व ए.पी.एम.सी. मार्केट आवारात वाहनांची वा माणसांची गर्दी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी ए.पी.एम.सी. प्रशासनाला केलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे ए.पी.एम.सी. मार्केट आवारात स्क्रिनिंग झालेल्या व्यक्तीलाच प्रवेश देण्यात यावा असे आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच विक्रेते, कर्मचारी, कामगार, ग्राहक अशा सर्वच घटकांनी परस्परांमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर (सोशल डिस्टसिंग) राखले जाईल याचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, मार्केट आवारात एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, मार्केट आवारातील प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंड झाकणारे मास्क परिधान करणे आवश्यक आहे. तसेच कामगार यांनी हॅण्डग्लोव्हज वापरणे बंधनकारक करावे, मार्केट आवारात हात धुण्यासाठी पुरेशा प्रमाणात आवश्यक व्यवस्था करण्यात यावी तसेच हॅण्ड सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, मार्केट आवारात महानगरपालिकेशी संपर्क ठेवून वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, मार्केट आवारात प्रवेश करताना व बाहेर पडताना प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था ए.पी.एम.सी. मार्फत करण्यात यावी, मार्केट आवारात प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, मार्केट आवारात सर्दी, ताप, घशात खवखव अथवा श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे आढळणा-या व्यापारी, कर्मचारी, कामगार यांना प्रवेश देण्यात येऊ नये तसेच अशा व्यक्तींची नावे, पत्ते, संपर्कध्वनी क्रमांक महानगरपालिकेस कळविण्यात यावेत अशाप्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्तांच्या वतीने ए.पी.एम.सी. प्रशासनास स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment