नवी मुंबई:- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका महिला नोकरदार वर्गाला झाला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेले 4 महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता नवी मुंबई ते मुंबई ये-जा प्रवास करण्याकरिता विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेली 4 महिने नवी मुंबईसह मुंबईतील नोकरदार महिला या विनावेतन रजेवर होत्या. सद्यस्थितीत अनलॉक सुरू झाल्यानंतर नवी मुंबई मधून मुंबईकडे किंवा मुंबईमधून नवी मुंबईकडे नोकऱ्यांसाठी महिलांचा प्रवास अनियमित होत असतो. परंतु सध्याच्या नियमावलीप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांना बस,ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना ऑटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नसल्याने शेवटी बस हाच एक पर्याय या महिलांसाठी आहे. परंतु कोविडची नियमावली पाहता बसमधून प्रत्येक सीटवर एक प्रवासी व उभे पाच प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करता येऊ शकतो परंतु बस डेपोमधून बसेस या नेहमी भरून येत असल्याने उर्वरित बस स्टॉपवरील महिलांना बस मिळण्यासाठी साधारण दीड ते दोन तास वाट बघावी लागत आहे. एकूण बस थांबे पाहता कोणत्याही बस थांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही, अशावेळी महिलांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दुसरीकडे लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता विशेष बस किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याबाबत एक महिला आमदार म्हणून अनेक महिलांची सातत्याने माझ्याकडे मागणी होत आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment