नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये लक्षणीय भर घातल्याबद्दल आयुक्तांनी मानले आभार
कोव्हीड 19 विरोधातील लढ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कोरोना बाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नियंत्रणाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. आरोग्य सुविधांमध्ये जाणवणारी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र शासनाने खंबीरपणे मदतीचा हात देत एन.आयव्ही., ॲडव्हान्स मोडचे मॉनिटरसह सर्व सुविधा असणारे 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान केले आहेत.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील नवी मुंबई महानगरपालिकेने उभारणी केलेल्या कोव्हीड केअर सेंटर व डोडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यापूर्वी अंतिम पाहणीप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री ना.श्री.राजेश टोपे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस व्हेंटिलेटर्स पुरविण्यात येतील असे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न करीत प्राधान्याने नवी मुंबई महानगरपालिकेस 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देत केली आहे. याबाबतच्या कार्यवाहीमध्ये ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त या 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे अधिक सक्षमीकरण झाले असून नवी मुंबईकर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment