नवी मुंबईतील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सद्यस्थितीची सादरीकरणाव्दारे माहिती देत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची व आगामी नियोजनाची माहिती मंत्री महोदयांना दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर महापालिका विभागप्रमुख उपस्थित होते.
कोव्हीड 19 चाचण्यांसाठी काही दिवसातच नवी मुंबई महानगरपालिका स्वत:ची आरटीसीपीआर लॅब सुरू करीत असल्याबद्दल तसेच शहरातील बेड्सची संख्या रिअल टाईम नागरिकांना समजण्यासाठी ऑनलाईन लाईव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी शहरातील व्हेंटिलेटर्स बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा असे सूचित केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस, ब्लडप्रेशर असे इतर आजार असणा-या व्यक्तींकडे अधिक लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले. ए.पी.एम.सी. मार्केट बंद करणे शक्य नाही मात्र त्याठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनींग व्हावी याकरिता विशेष उपाययोजना करणेबाबत त्यांनी निर्देशित केले.
No comments:
Post a Comment