वाशीचे पालिका रुग्णालय १५ सप्टेंबरपासून सर्व उपचारांसाठी खुले होणार
लोकनेते आ.गणेश नाईक यांची मागणी पूर्ण
नवी मुंबई प्रतिनिधी
वाशीचे प्रथम संदर्भ पालिका रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असल्याने कोरोना व्यतिरिक्त आजारांवरील उपचार बंद होते. इतर व्याधींच्या रुग्णांना उपचारासाठी एकमेव आधार असलेले हे रुग्णालय सर्व आजारांवरील उपचारासाठी खुले करावे, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी लावून धरली होती. त्या मागणीवर कार्यवाही होणार असून येत्या १५ सप्टेंबर २०२०नंतर हे रुग्णालय जनरल रुग्णालय म्हणून काम करणार आहे.
नवी मुंबईत कोरोना प्रतिबंधासाठी लोकनेेते आ.नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. पालिका आयुक्तांच्या त्या नियमित भेटी घेत आहेत. या आढावा बैठकांमधून त्यांनी केलेल्या उपयुक्त सुचनांवर पालिकेने सकारात्मक कार्यवाही केली आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय १५ सप्टेंबरपासून जनरल रुग्णालय म्हणून काम करण्यास सुरुवात करेल, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लोकनेते नाईक यांना सोमवारच्या भेटीत दिली आहे. नेरुळच्या डॉ डि. वाय. पाटील रुग्णालयाबरोबर पालिकेने करार केला असून या अंतर्गत त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यात २०० आय.सी.सी.यू. बेड व्हेंटिलेटर सुविधेसह उपलब्ध करुन दिले जात आहेत. या नंतर वाशीचे कोविड रुग्णालय नेरुळ येथे हलविण्यात येणार आहे. लोकनेते आ. नाईक यांच्या समवेत आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती नेत्रा शिर्के, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती सुरज पाटील, माजी सभापती शंकर मोरे, माजी सभापती विशाल डोळस आदी मान्यवरांचा समावेश होता.
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा? असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती लवकरात-लवकर अदा करावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली होती. या मागणीवर पालिकेचा शिक्षण विभाग अंतिम टप्प्यावर काम करीत असून लवकरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहाराचा लाभही विद्यार्थ्यांना द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी पालिकेकडे केली आहे.
कोविड सेंटरमधून व्हिटॅमिनच्या गोळया नसल्याच्या बातम्या येत असल्याबददल प्रसिध्दी माध्यमांनी विचारले असता ५० हजार गोळयांचा साठा सद्यस्थितीत पालिकेकडे असल्याची माहिती आपल्याला आयुक्त बांगर यांनी दिल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. कोविडसह इतर सर्व पालिका रुग्णालयांमधून औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सुचना लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.
कोरोना निर्मुलनासाठी आरोग्यावर प्राधान्याने खर्च करीत असताना शहर विकासाच्या बाबींकडे लक्ष देण्याची सुचना त्यांनी पालिका आयुक्तांना केली. बगिचे, रस्ते, पदपथ, उडडाणपूल, परिवहन बसेस,शाळांच्या इमारती अशा सर्व सेवा आणि वास्तूंच्या देखभालीसाठी पालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न, झालेला खर्च, विनियोग न झालेला निधी यांचा समग्र आढावा घेवून खर्चाचे नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने प्राप्त केलेले यश हे जागरुक नवी मुंबईकर, सतर्क लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष पालिका कर्मचारी-अधिकारी आणि विशेषकरुन प्रत्यक्ष काम करणारे सफाई कर्मचारी तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारी प्रसिध्दी माध्यमं यांना असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षणात देशस्तरावर तिसरा क्रमांक नवी मुंबईला मिळाला आहे.पुढच्या वर्षी पाहिले स्थान पटकाविण्याचा प्रयत्न व्हावा,असे आवाहन त्यांनी केले.
अवतरण...
नवी मुंबईत जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरुच ठेवणार आहोत. पालिका आयुक्तांबरोबर आढावा बैठका होत राहतील.
-लोकनेते आ.गणेश नाईक
No comments:
Post a Comment